Ad will apear here
Next
अशोक समेळ, मिलिंद इंगळे, स्मिता सरवदे-देशपांडे, शेख मुख्तार


ज्येष्ठ रंगकर्मी अशोक समेळ, प्रसिद्ध संगीतकार व गीतकार मिलिंद इंगळे, प्रसिद्ध अभिनेत्री स्मिता सरवदे-देशपांडे यांचा १२ मे हा जन्मदिन. तसेच, बॉलीवूडचे पहिले ‘माचो मॅन’ अभिनेते शेख मुख्तार यांचा १२ मे हा स्मृतिदिन. त्या निमित्ताने, त्यांचा हा अल्प परिचय...
..........
अशोक समेळ
१२ मे १९४३ रोजी अशोक समेळ यांचा जन्म झाला. लेखक, दिग्दर्शक, निर्माता, अभिनेता अशा सर्व भूमिका यशस्वीपणे सांभाळणारं व्यक्तिमत्त्व म्हणजे अशोक समेळ. गेल्या ५०हून अधिक वर्षे मराठी, गुजराती रंगभूमी, मराठी चित्रपट, मालिकांमध्ये लेखक, दिग्दर्शक, अभिनेता, निर्माता, कादंबरीकार म्हणून अशोक समेळ यांची कारकीर्द गाजलेली आहे. लहानपणापासून कलेची आवड असणाऱ्या अशोक समेळ यांनी घरच्या गरीबीवर जिद्दीने मात करून अपार मेहनतीने आतापर्यंतचा पल्ला गाठला आहे. विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या अशोक समेळांची कामगिरीही तितकीच विविधांगी आहे. 

अशोक समेळ यांनी सुरुवातीला सेंट्रल बँकेत नोकरी पत्करली होती. घरात वाचन आणि कलेची आवड असल्याने या क्षेत्राची ओढ निर्माण झाली. त्यामुळे लेखक म्हणून त्यांनी १८ मराठी व्यावसायिक नाटकं, २३ गुजराती नाटकं, ९ प्रायोगिक नाटकं, तसेच दूरदर्शनवरील मालिकांच्या दोन हजारांपेक्षा जास्त भागांचे लेखनही त्यांनी केलेले आहे. ‘मी अश्वत्थामा चिरंजीव’ या पुस्तकाचे लेखन त्यांनी केले आहे. त्यांनी ‘मी मालक या देशाचा’, ‘इथे ओशाळला मृत्यू’, ‘तो मी नव्हेच’, इत्यादी जवळपास १७ नाटकांमध्ये, तसेच १६ दूरदर्शन मालिकांमध्येही अभिनय केलेला आहे. 

अशोक समेळ यांनी दिग्दर्शक म्हणूनही आपला वेगळा ठसा उमटवला आहे. नाटकं, आकाशवाणीवर कार्यक्रम, दूरदर्शन मालिका अशा विविध ठिकाणी त्यांनी दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. दिग्दर्शक म्हणून ‘नटसम्राट’, ‘राजा रविवर्मा’, ‘जन्मदाता’ अशी नाटकं त्यांच्या खात्यात जमा आहेत. एवढं सगळं करताना त्यांचे ठाण्याच्या कलाक्षेत्रातील योगदानही महत्त्वपूर्ण आहे. त्यांनी ठाण्यात, महानगरपालिकेच्या साह्याने व महापौरांच्या मदतीने टेंभीनाका येथे प्रायोगिक चळवळ सुरू केली, ज्याद्वारे ते विनामूल्य गोरगरीब व सर्वसाधारण स्तरातल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. 

या चळवळीचे आणखी एक महत्त्वपूर्ण काम म्हणजे, या प्रायोगिक चळवळीतून त्यांनी सर्व ठाणेकरांना घेऊन ‘संन्यस्त ज्वालामुखी’ हे ४० तासांत सलग ११ प्रयोग करणारं विक्रमी नाटक सादर केलं. हा विक्रम ‘लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये विराजमान झाला. वाचनाच्या आवडीतून अनेक पुस्तके, कथा, कादंबऱ्या त्यांनी विकत घेऊन वाचून काढल्या. त्यांनी आपण जमवलेल्या १४ हजार पुस्तकांचे दालन ठाण्यातील आपल्या आसपासच्या रहिवाशांसाठी खुले करून वाचकांना प्रोत्साहित केले आहे. 

विविधांगी कामगिरीबद्दल त्यांना आतापर्यंत एकूण ३४हून अधिक पुरस्कार मिळाले आहेत. त्यात ‘मामा वरेरकर पुरस्कार (१९८४)’, ‘नाट्यदर्पण पुरस्कार (१९८४/१९९६)’, अ. भा. म. ना. प.चा ‘आचार्य अत्रे पुरस्कार’, ‘राम गणेश गडकरी पुरस्कार’, ‘ठाणे गौरव’, ‘ठाणे नगर रत्न पुरस्कार’ इत्यादी अनेक पुरस्कारांचा समावेश होतो. अशोक समेळ यांनी ‘स्वगत’ या नावाने आत्मकथन लिहिले आहे. 

अशोक समेळ यांच्या पत्नी संजीवनी समेळ यादेखील मराठी चित्रपट आणि मालिकासृष्टीतील जाणत्या कलाकार. कलर्स मराठीवरील बाळू मामाच्या नावानं चांगभलं, लक्ष्मी सदैव मंगलम्, तसेच झी युवावरील ‘ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण’ या मालिकेत त्यांनी महत्त्वाच्या भूमिका बजावल्या आहेत. त्यांचा मुलगा संग्राम समेळ ललित ३०५, पुढचं पाऊल या मालिका, तसेच एकच प्याला, कुसुम मनोहर लेले या नाटकांतून पुढे आला. अभिनेत्री पल्लवी पाटील हिच्यासोबत संग्राम विवाहबंधनात अडकला. पल्लवी आणि संग्राम एकत्रितपणे कुसुम मनोहर लेले हे नाटक साकारत आहेत.
...........
मिलिंद इंगळे
१२ मे हा मिलिंद इंगळे यांचा जन्मदिन. मिलिंद इंगळे या नावाबरोबर मराठी संगीत रसिकांच्या मनावर तरल भावपूर्ण आवाजाची झुळूक गारवा देऊन जाते. त्यांच्या ‘गारवा’ या सौमित्र लिखित गाण्याच्या अल्बमने वीस-बावीस वर्षांपूर्वी मराठी मनाला आल्हाद दिला, त्याची मोहिनी आजही कायम आहे. मिलिंद इंगळे यांचे पणजोबा व आजोबा सांगली व इचलकरंजी संस्थानात दरबारी गायक होते. वडील पं. माधव इंगळे शास्त्रीय संगीतात निपुण. मिलिंद हे ग्वाल्हेर घराण्याची गायकी चालवणारे पाचव्या पिढीचे शिलेदार. आज जरी हे चित्र दिसत असले तरी ग्रॅजुएट होईपर्यंत त्यांनी संगीताचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलेले नव्हते. मिलिंद यांचे शालेय शिक्षण पुण्याला तर कॉलेज शिक्षण मुंबईत झाले. कॉलेजमध्ये संगीत स्पर्धांमध्ये त्यांनी भाग घेतला व बक्षिसेही मिळवली. पदवीनंतर मात्र त्यांनी संगीत क्षेत्रात काम करायचे निश्चित केले व पं. यशवंतबुवा जोशी यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेतले. गझल गायकीचे बारकावे, हरकती श्री. के. महावीर आणि राजकुमार रिझवी यांनी त्यांना शिकवल्या.

आपण ऑर्केस्ट्रामध्ये गायचे नाही याबाबत ते ठाम होते. मात्र आठवणीतील गाणी, शब्दांच्या पलीकडले, आरोही अशा कार्यक्रमातून त्यांचे गाणे रसिकांच्या पसंतीला उतरत होते. ‘आम्ही दोघे राजाराणी’ या चित्रपटातून नायकासाठी गाणी गाण्याची संधी त्यांना मिळाली. शब्दप्रधान हळुवार भावपूर्ण गाण्याची आवड. स्वतः संगीत देऊन अशी गाणी लोकांपुढे आणावी अशी त्यांची मनीषा होती. त्याचवेळी राजश्री प्रोडक्शनने संगीत क्षेत्रात काम करण्याचे ठरवले व मिलिंदजीना विचारणा केली. त्यांनी सौमित्र रचित कवितांची केलेली ‘गारवा’ अल्बमची तयार गाणी त्यांना ऐकवली; मात्र राजश्रीला प्रथम हिंदी अल्बम करायचा होता. त्यामुळे मिलिंदजींनी ‘ये है प्रेम’ हा अल्बम केला. त्यातील ‘छुईमुईसी तुम लगती हो’ हे गाणे लोकप्रिय झाले. त्यामुळे राजश्री प्रोडक्शनने ‘गारवा’ करण्याचेही कबूल केले. ‘गारवा’ ने तर इतिहासच रचला. यानंतर ‘रसिया’, ‘सांजगारवा’, ‘सुर्यास्त’ हे अल्बम आले. २५/३० मराठी चित्रपटांतही त्यांनी पार्श्वगायन केले. जुली, प्रारंभ, गोजिरी, यमाच्या गावाला जाऊया, प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं या चित्रपटांचे संगीत, इंद्रधनुष्य, M2G2, गेट वेल सून, मेरी सहेली अशा मालिकांची शीर्षकगीते, डॉटर या हिंदी चित्रपटाला संगीत व हनन या हिंदी चित्रपटात पार्श्वगायन असा प्रवास चालूच राहिला. 

ज्ञानेश वाकुडकर लिखित १४ ओळींचे सुनीत (sonet) प्रकारचे एक कडवे अशी २१ कडवी असलेले ‘सखे सजणी’ हे सलग ३६ मिनिटांचे गीत त्यांनी स्वरबद्ध केले. मिलिंद इंगळे यांनी आजवर ५००हून अधिक जाहीर कार्यक्रम केले आहेत. जगभरात कार्यक्रम करण्याची संधी त्यांना मिळाली. ‘मुखातीब’ हा गझलांचा कार्यक्रम, ‘आज मुझे कुछ कहना है’ हा स्वर्गीय किशोर कुमार यांच्या वरील आगळावेगळा कार्यक्रम आणि ‘गारवा शब्द सुरांचा’ हा मराठी गीतांचा कार्यक्रम ही मिलिंदजींची स्वतःची निर्मिती ज्याची अनेकांनी वाहवा केली. 

१९९४ साली कलकत्त्यातील गझल स्पर्धेचे विजेतेपद, केशवराव भोळे स्मृती पुरस्कार, झी गौरव २००७ चा पार्श्वगायनाचा पुरस्कार, सारेगम युद्ध ताऱ्यांचे २००७चा विजेता मेंटॉर आणि राष्ट्रीय शिक्षण व मानव संसाधन विकास महामंडळाचा २००९ चा पुरस्कार अशा गौरवांनी मिलिंदजींची कारकीर्द उजळली आहे. 

मिलिंद इंगळे यांच्या पत्नी मानसी इंगळे पत्रकार होत्या. नोकरी सोडून त्यांनी इव्हेंट मॅनेजमेंट सुरू केले. झी मराठी, कलर्स मराठी, स्टार प्रवाह, झी टॉकीज, साम मराठी, झी युवा, झी २४ तास, जय महाराष्ट्र आणि अन्य काही खासगी संस्थांचे असे जवळजवळ साठ-सत्तर इव्हेंटचे मानसी इंगळे यांनी यशस्वीरित्या नियोजन केले आहे. सुरेल क्रिएशन प्रा. लि. या कंपनीच्या त्या क्रिएटिव्ह डायरेक्टर आहेत. मिलिंद इंगळे यांचा मुलगा ‘सुरेल’ याचेही संगीतात करिअर करण्याचे स्वप्न आहे. बीएमएमचे शिक्षण पूर्ण झाल्यावर अमेरिकेतील म्युझिशियन इन्स्टिट्यूट हॉलिवूडमधील शिक्षण पूर्ण करून तो भारतात आला. ‘प्रेम म्हणजे प्रेम’ या चित्रपटाचे बॅकग्राऊंड म्युझिक त्याने केले. हॉलिवूडमध्ये काही लहान-मोठे प्रोजेक्ट, काही जाहिराती अशी त्याची वाटचाल चालू आहे. आज विलेपार्ल्यात त्यांची ‘म्यूजिक अँड सोल’ ही संगीत अकादमी आणि सुसज्ज स्टुडिओ नवीन कलाकारांना संगीत शिक्षण देत आहे. (संदर्भ : संगीता बेहरे)
....


स्मिता सरवदे-देशपांडे
१२ मे १९७६ रोजी स्मिता सरवदे यांचा जन्म झाला. ‘होणार सून मी या घरची’ या मालिकेत ‘सरूमावशी’ हे पात्र रसिकांना आवडले होते. या मावशीचा अत्यानंद महाराजांवर फार विश्वास. जरा काही चांगलं घडलं की आकाशात हात जोडत ‘अत्यानंद महाराजांची कृपा म्हणावी’ असं तिचं ठरलेलं वाक्य. या अत्यानंद महाराजांमुळे जान्हवीच्या सहाही सासवांमध्ये तिनं प्रेक्षकांच्या मनात वेगळेच घर केले होते. ही सरू मावशी म्हणजे स्मिता सरवदे- देशपांडे.

स्मिता सरवदे यांना शाळेत असताना नृत्याची खूप आवड होती. बारावीत असताना एका नृत्याच्या कार्यक्रमात त्यांनी भाग घेतला होता. त्याच दरम्यान त्यांना ‘मोरूची मावशी’ या नाटकात काम करण्याची संधी मिळाली. खरं तर ती रिप्लेसमेंट होती. पण याच रिप्लेसमेंटमुळे या इंडस्ट्रीत नशीबाचं दार त्यांच्या खुलं झालं. त्यानंतर ‘सूत्रधार द बॉस’, ‘बाकी सारं’, माकडाच्या हाती शॅम्पेन यांसारख्या नाटकांतून त्यांनी महत्त्वाच्या भूमिका केल्या. ‘बाकी सारं’ या नाटकातल्या त्यांच्या अभिनयाला तर इंडस्ट्रीतल्या बड्या कलाकारांनीदेखील दाद दिली. त्यांना नीना कुलकर्णी, गिरीश ओक, वंदना गुप्ते यांसारख्या रंगमंचावरच्या मोठ्या कलाकारांसोबत काम करण्याची संधीदेखील मिळाली.

जवळजवळ दहा वर्षांहूनही अधिक काळ रंगभूमीवर काम केल्यानंतर स्मिता सरवदे टीव्ही सीरिअल्सकडे वळल्या. ‘होणार सून मी या घरची’ या मालिकेत येण्याआधी स्मिता सरवदे यांनी मुंबई मेरी जान, माझी माणसे, आम्ही असू लाडके अशा हिंदी-मराठी चित्रपटातून कामे केली होती. त्यांनी सब चॅनेलवरच्या ‘मिसेस तेंडुलकर’ या मालिकेतही काम केले आहे. मराठी टीव्ही इंडस्ट्रीत त्यांनी प्रवेश केला तो ‘आभाळमाया’ या मालिकेतून. ‘होणार सून मी या घरची’ ही त्यांची गाजलेली मालिका होय. ‘भाखरवडी’ या हिंदी मालिकेतही त्यांनी काम केले आहे.
...........


शेख मुख्तार 
२४ डिसेंबर १९१४ रोजी कराची येथे शेख मुख्तार यांचा जन्म झाला. सहा फूट दोन इंच उंच असलेले शेख मुख्तार यांचे व्यक्तिमत्त्व रुबाबदार होते. त्यांचा जन्म कराचीचा असला तरी वडील पोलिसांत असल्याने व वडिलांच्या बदलीमुळे ते दिल्लीला आले. दिल्लीतच त्यांचे शिक्षण झाले. आपल्या तब्येतीमुळे व रुबाबदार व्यक्तिमत्त्वामुळे त्यांनाही पोलिस व्हायचे होते; पण नशिबाने त्यांना बॉलीवूडमध्ये आणले व ते बॉलीवूडचे ‘माचो मॅन’ बनले. शेख मुख्तार यांना बॉलीवूडचे पहिले ‘माचो मॅन’ म्हणून ओळखले जाते. 

नाटकाच्या हौसेमुळे ते दिल्ली सोडून कोलकात्याला गेले व तेथे त्यांनी एका रंगमंच कंपनीत नोकरी मिळवली व १९३८पासून त्यांची अभिनयाची यात्रा सुरू झाली. १९३९ साली आलेल्या एक ही रास्ता या चित्रपटात अभिनेत्री नलिनी जयवंत यांच्याबरोबर अभिनय करून त्यांनी बॉलीवूडमध्ये प्रवेश केला. त्यांनी आपल्या करिअरमध्ये ४० चित्रपटांत अभिनय केला व आठ चित्रपट बनवले. 

स्पाय इन गोवा, भूख, टूटे तारे, दादा, घायल, उस्ताद पेड्रो, मंगू, मि. लम्बू, बेगुनाह, डाकू मानसिंह, रोटी, नयी जिंदगी, गुरू और चेला, चंगेझखान, उस्ताद ४२० असे त्यांचे चित्रपट खूप गाजले. १९८०पर्यंत त्यांचे चित्रपट चांगले चालले. १९८० साली त्यांनी नूरजहाँ हा चित्रपट बनवायला घेतला. शेख मुख्तार यांनी नूरजहाँ या चित्रपटासाठी आपली सर्व पुंजी रिकामी केली होती. १९८० साली नूरजहाँ या चित्रपटाचे निर्माते म्हणून त्यांना खूपच नुकसान झाले. या चित्रपटात प्रदीप कुमार मुख्य अभिनेते व मीनाकुमारी नूरजहाँच्या भूमिकेत होत्या. दिल्लीच्या डिलाइट सिनेमामध्ये नूरजहाँचा ऑल इंडिया प्रीमियर शो ठेवला गेला होता. हा चित्रपट नंतर पाकिस्तानात प्रदर्शित केला गेला. तेथे त्याने चांगला व्यवसायही केला; पण तो बघण्यासाठी शेख मुख्तार हयात राहिले नाहीत. नूरजहाँची एक प्रिंट पुण्याच्या नॅशनल फिल्म अर्काइव्हज ऑफ इंडिया या संस्थेत ठेवली आहे. 

शेख मुख्तार यांचे १२ मे १९८० रोजी निधन झाले.

माहिती संकलन : संजीव वेलणकर

संगीतकार इक्बाल कुरेशी यांचा १२ मार्च हा जन्मदिन. त्यांच्याविषयी अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा. 

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/BZUPCM
Similar Posts
राम गणेश गडकरी, डी. एस. खटावकर, पं. दिनकर कैकिणी नामवंत लेखक, कवी, नाटककार राम गणेश गडकरी, ख्यातनाम शिल्पकार, चित्रकार, मूर्तिकार दत्तात्रेय श्रीधर खटावकर आणि आग्रा घराण्याचे गायक पं. दिनकर कैकिणी यांचा २३ जानेवारी हा स्मृतिदिन. त्या निमित्ताने, त्यांचा हा अल्प परिचय...
नंदू भेंडे, जेम्स पार्किन्सन, शुभांगी अत्रे-पुरी मराठीतील पहिले रॉकस्टार नंदू भेंडे यांचा ११ एप्रिल हा स्मृतिदिन. तसेच, पार्किन्सन्स डिसीजचा शोध लावणारे ब्रिटिश डॉक्टर जेम्स पार्किन्सन आणि अभिनेत्री शुभांगी अत्रे-पुरी यांचा ११ एप्रिल हा जन्मदिन. त्या निमित्ताने, त्यांचा हा अल्प परिचय...
बाबा आमटे, राजा परांजपे, शोभना समर्थ, मीना शौरी ख्यातनाम समाजसेवक बाबा आमटे, नामवंत अभिनेते-दिग्दर्शक राजा परांजपे, अभिनेत्री शोभना समर्थ आणि अभिनेत्री मीना शौरी यांचा नऊ फेब्रुवारी हा स्मृतिदिन. त्या निमित्ताने, त्यांचा हा अल्प परिचय...
अब्दुल हलीम जाफर खान, पं. उल्हास बापट, सर आयझॅक पिटमॅन ज्येष्ठ सतारवादक अब्दुल हलीम जाफर खान, ख्यातनाम संतूरवादक पं. उल्हास बापट आणि लघुलिपीचे (शॉर्टहँड) जनक सर आयझॅक पिटमॅन यांचा चार जानेवारी हा स्मृतिदिन. त्या निमित्ताने त्यांचा हा अल्प परिचय...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language